खुलताबाद -गंगापूर तालुक्याला झोडपले; चार मंडळात अतिवृष्टी
सलग दोन महिन्यांपासून बरसणार्या वरुण राजाने जुलै महिन्याची सांगताही धो-धो कोसळत केली. काल रात्री जिल्हाभर तुफान पाऊस कोसळला. खुलताबाद 55 मिमी व गंगापूर 46.2 मिमी या दोन तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तर चार मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे.
एक जून पासून सुरू झालेला पाऊस थोड्या थोड्या खंडानंतर बरसतो आहे. जून-जुलै या दोन महिन्याची जिल्ह्याची सरासरी 277 मिलिमीटर असताना आतापर्यंत तब्बल 512 मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक आतापर्यंत सर्वाधिक 606 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल खुलताबाद 596 मिमी, फुलंब्री 538, कन्नड 536, गंगापूर 508, पैठण 501, वैजापूर 495, सोयगाव 483 तर सिल्लोड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 383 मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या 184 टक्के पाऊस पडला आहे. गेल्या दशकभरात पावसाची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
शेवटचा दिवसही पावसाचा!
जून महिन्यात जोरदार बरसणारा पाऊस जुलै महिन्याच्या मध्यावर काही काळ विसावला होता. मात्र शेवटच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पावसाने दस्तक दिली. काल 31 जुलै रोजी सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक 55 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गंगापूर शहर 46.2, कन्नड 42.3, औरंगाबाद 39, वैजापूर 20.2, पैठण 18.5, सोयगाव 19.2, सिल्लोड 15.8 तर फुलंब्री तालुक्यात 12.5 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात काल सरासरी 29.8 मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
चार मंडळात अतिवृष्टी!
जिल्ह्यातील चार मंडळात काल रात्री अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. शेंदुरवादा (ता गंगापूर ) मंडळात 86 मिमी, कन्नड तालुक्यातील चिकलठाणा मंडळात 83, चिकलठाणा (ता. औरंगाबाद ) 81.75 मिलिमीटर तर त्याखालोखाल तर गंगापूर मंडळात 78 मिमी पावसाची नोंद झाली आहे.